पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी अर्थात एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने असलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी २४ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या प्रवेश परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
दूरस्थ विभागातर्फे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येतात. आता त्यात एमबीए अभ्यासक्रमाची भर पडली आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा संगणकाद्वारे घेतली जाणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्र अर्ज भरावे लागतील. परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे.
परीक्षेसाठी एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन आणि दूरस्थ अशा स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन किंवा दूरस्थ यातून एका प्रकारच्या अभ्यासक्रमाची निवड करावी लागणार आहे, अशी माहिती मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी माहिती दिली.
विद्यापीठातर्फे अभ्यास केंद्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमध्येच असतील. प्रवेश परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना घरबसल्या परीक्षा देता येईल. या अभ्यासक्रमाचा प्रतिसाद पाहून वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविण्याचाही विचार करण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली. अभ्यासक्रम आणि प्रवेश परीक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.