Pune Mayor Election – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता महापालिकेत सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. १६५ मधील ११९ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडेच असणार आहेत. त्यातच, ही निवडणूक कधी होणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. महापौर निवडीसाठी ६ फेब्रवारीला पहिली मुख्यसभा घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून ६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे आयुक्त नवल किशोर राम सांगितले.महापौर व उपमहापौर निवडीसाठी होणाऱ्या पहिल्या विशेष सभेत या दोन्ही पदांसाठी निवड झाल्यानंतर महापालिकेची मुख्यसभा अस्तित्वात येणार असून निर्वाचित उमेदवारांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. राज्य शासनाकडून २२ जानेवारीला महापौरपदाचे आरक्षण काढण्यात आल्यानंतर २३ जानेवारीला पालिका प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना पत्र पाठवत महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली सभा म्हणजेच महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याबाबत तारीख , भाजप पुणे वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या निश्चिती करिता पत्र पाठविण्यात आले होते. त्यानुसार, विभागीय आयुक्तांनी ही पहिली विशेष सभा शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ला सकाळी ११.०० वाजता घेण्यात येईल, असे महापालिकेस कळविले आहे. या निवडणुकीसाठीचे वेळापत्रक पुढील काही दिवसात जाहीर केले जाणार आहे. दोन्ही पदे भाजपकडेच ? महापालिका निवडणुकीत १६५ मधील ११९ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून ही दोन्ही पदे भाजपकडेच असणार आहे. २०१७ मध्ये भाजपने महापौरपद स्वत:कडे ठेवत उपमहापौरपद काही काळा रिपाईला दिले होते. मात्र, त्याबाबत अद्याप दोन्ही पक्षात चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. महापौरपद सर्वसाधरण गट महिलांसाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये या दोन्ही पदांसाठी चुरस आहे. भाजपमध्ये वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, मानसी देशपांडे, स्मिता वस्ते, रंजना टिळेकर, या सभागृहाच्या कामकाजाचा १० पेक्षा अधिक वर्षे अनुभव असलेल्या महिला सदस्या आहेत. तर पक्ष संघटनेत काम केलेल्या अर्चना पाटील, मंजूश्री खर्डेकर, मनिषा चोरबेले अशा नगरसेविकाही इच्छुक असून पहिल्यांदाच महापालिकेत निवडून आलेल्या महिला सदस्यांकडूनही या पदासाठी दावा केला जात आहे.