पुणे – उत्तमनगर येथील कोपरे गावाजवळील एका बस गॅरेजच्या शेजारी साठा करुन ठेवलेल्या थिनरच्या बॅरेलच्या साठ्याला भीषण आग लागली़. त्यात तेथे असणारे दोघे भाडेकरु जखमी झाले आहेत़.
या आगीमध्ये या शेडबाहेर उभ्या असलेल्या दोन लक्झरी बसगाड्या जळून खाक झाल्या असून शेडमधील १५ ते २० बॅरेल जळून गेले़. सुमारे २ तासात ही आग भडकत होती़. याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरे गावाजवळ एका बस गॅरेजच्या शेजारी एका शेडमध्ये थिनरचा बेकायदेशीरपणे मोठा साठा करुन ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या शेडमधील या साठ्याला आग लागली.
त्यात येथील दोघे भाडेकरु भाजले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या ठिकाणी थिनरचे १५ ते २० बॅरेल एकमेकांना लागून ठेवण्यात आले होते. या आगीचा भडका होऊन शेड या बॅरलवर कोसळले होते. सिंहगड रोडवरील अग्निशमन केंद्राची पहिली गाडी घटनास्थळी पोहचली़ या गाडीवर अधिकारी नसल्याचे समजते. जवानांनी आग पाहून तातडीने पाणी मारण्यास सुरुवात केली़ मात्र, आग विझण्याऐवजी ती अधिकच भडकली़ तोपर्यंत इतर केंद्रावरील गाड्या घटनास्थळी पोहचल्या.
पाणी मारणे थांबून फोमचा समावेश असलेला मारा सुरु करण्यात आला. परंतु, जळणाऱ्या बॅरेलवर शेडचे पत्रे पडले असल्याने फोमचा उपयोग होत नव्हता. तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी हे आग सुरु असतानाच हे पत्रे हुकाच्या सहाय्याने बाजूला केले. तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. ही आग शेजारील बस गॅरेजमध्ये पोहचून तेथील इलेक्ट्रीक साहित्य जळून
खाक झाले. या शेडच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन लष्करी बसला झळ बसली असून त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.