हर्षद कटारिया
मार्केट यार्ड (प्रतिनिधी) – सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपीकांची भुसार विभागप्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कामकाजाबाबतही व्यापाऱ्यांकडून तक्रारी वाढल्या आहेत, त्यामुळे त्यांची नियुक्ती नियमबाह्य ठरवावी, त्यांची चौकशी करावी, अशी लेखी मागणी सुहास बनसोडे यांनी पणन संचालक, सहसंचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली होती. त्यानुसार कनिष्ठ लिपीकांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कनिष्ठ लिपीकांच्या पदोन्नती नियुक्तीनंतर त्यांच्या विरोधात अनेक व्यापाऱ्यांच्या सुद्धा तक्रारी आहेत. मात्र या तक्रारींकडे वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, यासर्व गोष्टीची दखल घेत याबाबत स्पष्टीकरण द्यावे तसेच बाजारस्तरावर चौकशी करण्यात यावी, यासंदर्भातील अहवाल तत्काळ द्यावा, असे आदेश पणन विभागाचे सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी दिले आहेत. परंतु, संबंधीतास पदावर ठेवून चौकशी नैसर्गिक न्यायतत्त्वावर करणे उचित ठरणार नाही, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.
दरम्यान, मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात गाळेधारकांना सेस, दप्तर तपासणी, व्यापार परवाने देणे याबाबत विविध प्रकारांच्या नोटीसा पाठवून कारवाईचा फार्स दाखवून विशेष शुल्क घेतले जात असल्याचे प्रकार होत असल्याचे व्यापारी सांगतात, व्यवसाय परवाना नूतनीकरण देण्यासाठी अर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते, अर्थिक पूर्तता केली नाही तर अन्य कागदपत्रांची कारणे सांगून कामे पेंडीग ठेवून त्रास दिला जातो, असे एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
विशेष म्हणजे, बाजारसमितीच्या गैरकारभारावर आमदार माधुरी मिसाळ यांनी नाराजी दर्शवत मागील महिन्यांतच संबंधीत अधिकाऱ्यांची कार्यालयात जाऊन कानउघडणी केली होती.
व्यापाऱ्यांना विविध प्रकारे चौकशीच्या नोटिसा पाठवून नाहक त्रास दिला जातो, दुकानास परवाने देताना नाहक अडवणूक केली जाते, व्यापाऱ्यांनी न्याय मागण्या केल्यास सूड उगवला जातो. वरिष्ठांनी पारदर्शक व प्रामाणिकपणे चौकशी केल्यास मोठे गभाड सापडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अडचणीमुळे व्यापारी त्रस्त असताना असे प्रकार तातडीने बंद झाले नाहीत तर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे.
– प्रविण चोरबेले , माजी अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर
पणन विभागाचे सहसंचालकांनी माझ्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याबाबत मला माहिती नसून कार्यालयातून माहिती घेऊन बोलणे योग्य राहील. व्यापाऱ्यांना नेहमीच सहकार्य करीत आलो आहे.
– प्रशांत गोते, कनिष्ठ लिपीक, कृषी उत्पन्न बाजार समिती