पुणे – करोनाच्या नवीन निर्बंधामुळे मार्केट यार्डाती फळ, भाजीपाला, भुसार विभागातील व्यवहाराची वेळ कमी करण्यात आली आहे. आता फळ, भाजीपाला विभाग दुपारी दोनपर्यंत, तर भुसार विभाग दुपारी चारपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने राज्य सरकारने पुन्हा नव्याने निर्बंध लादले आहेत. त्यानुसार शहरात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तर, शनिवार, रविवार दुपारी चारपर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यानुसार मार्केट यार्डातही व्यापारासाठी असलेले निर्बंध वाढले आहे.
पूर्वी 3 पर्यंत सुरू असलेल्या फळ, भाजीपाला विभाग आता दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर, पूर्वी सातपर्यंत सुरू असलेल्या भुसार विभागातील व्यवहार आता दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.