पुणे – मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणारा सेस कमी करा, पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणारा मिळकत कर रद्द करावा, तसेच लिंबाची किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी आदी मागण्यांचे निवेदन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या वतीने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना मंगळवारी देण्यात आले.
बाजार आवारातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी व पानाचा व्यापार करणाऱ्या आडत्यांच्या गाळ्यावर पुणे महापालिकेकडून मिळकत कर आकारण्यात येतो. प्रत्यक्षात महापालिकेकडून बाजार आवारात कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाही. त्यामुळे, आवारात नियमित शेतमालाचा व्यापार करणाऱ्या गाळ्यांवर आकारण्यात येणारा महापालिकेचा कर रद्द करण्यात यावा.
नव्या कायद्यानुसार बाजार आवाराबाहेरील शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारू नये असा निर्णय घेतला आहे. मात्र, बाजार आवारामध्ये शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर सेसच्या रुपाने शुल्क घेण्याचा निर्णय कायम आहे. त्याची आकारणीही बाजार समिती प्रशासनाने करू नये.
आवारात झाडलोट, साफसफाई, पाणीपुरवठा, सुरक्षा आदी सेवा पुरविणाऱ्या बाजार समितीने सर्व सेवांच्या मोबदल्यात कराची आकारणी करावी. तसेच, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील किरकोळ लिंबू विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असल्याचे अध्यक्ष विलास भुजबळ व सचिव रोहन उरसळ यांनी सांगितले.