पुणे -महापालिकेच्या मुख्य इमारतीसह प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही प्रभाग रचनेचे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले.
शहराचा एकत्रित नकाशा महापालिकेच्या मुख्य इमारतीत लावण्यात येणार असून क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रभागांचे नकाशे लावण्यात येणार आहेत. तसेच, महापालिकेच्या संकेतस्थळावरही हे नकाशे एकत्रित स्वरूपात लावण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी कळविले आहे. या नकाशांवर नागरिकांना उद्यापासूनच हरकती घेता येणार असून दि. 14 फेब्रुवारीपर्यंत त्या नोंदविता येणार आहे. मात्र, त्या कोठे आणि कशा द्याव्यात याबाबत कोणतीही माहिती पालिकेकडून जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, सकाळी 11 वाजता हे नकाशे जाहीर केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.