पुणे : उन्हाळ्यामध्ये शहरासह जिल्ह्यातील रुग्णालये, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागतो. परिणामी नातेवाईकांची रक्त पिशवी मिळविताना दमछाक होते. त्यांची ही दमछाक कमी व्हावी, यासाठी दैनिक प्रभात परिवाराकडून दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान शिबिर आयोजित करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास हातभार लावला जातो. यंदाही रक्तदान शिबिरातून शंभर रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
नारायण पेठेतील ‘प्रभात’च्या मुख्य कार्यालयातील सभागृहात शनिवारी (दि. २२) हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. सकाळी नऊ वाजता केशव खराडे यांनी प्रथम रक्तदान करून शिबिराला सुरुवात झाली. या वेळी दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक रविकुमार इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, व्यवस्थापक प्रवीण थूल, मुख्य लेखाधिकारी अशोक जोशी आदी उपस्थित होते. या वेळी प्रभात परिवारातील सदस्यांसह पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातून दात्यांनी रक्तदानासाठी उपस्थिती लावून रक्तदानाचे व्रत पूर्ण केले.
आपत्कालीन स्थितीत अनेकदा रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्तींना रक्ताची गरज भासते. त्या वेळी रक्ताला कोणतीही नाती, जात, धर्म नसतो. रक्त हे निर्मल झऱ्यासारखे रुग्णांना जीवनदान देत असते. त्यामुळे आपल्या एका रक्तदानातून तीन ते चार व्यक्तींचा जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे, असे आवाहन दैनिक प्रभातकडून करण्यात आले.
त्यामुळे सकाळपासून दात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिर यशस्वी करण्यासाठी दैनिक प्रभात परिवारासह ब्लड ट्रान्सफ्युजन अधिकारी डॉ. विष्णु फुगाडे, जनसंपर्क अधिकारी रुपाली बांदल यांच्यासह वैभव मुऱ्हेकर, माधुरी लोणारी, स्मिता लाखन, अनामिका मुतमांगे, निशा अगरवाल, प्रतीक्षा सूर्यवंशी, आकाश केवत, सारिका रोढे, सुशील वाघमारे, मुंजा गरूडे, रामनाथ दास, सर्जेराव भोसले, दिव्या फेरे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
तरी आम्ही रक्तदान करू शकतो का?
रक्तदान शिबिरामध्ये जवळपास १३७ इच्छुकांनी नोंदणी करून तपासणी केली. त्या वेळी काहींचे हिमोग्लोबिन कमी, तर काहींना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसून आले. मात्र, अशा परिस्थितीतही महिलांनी आमचे हिमोग्लोबिन काठावर आहे, आम्ही रक्तदान करू शकतो का? त्यावर हिमोग्लोबीन आणि वजन दोन्ही कमी असल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केल्यावर महिलांनी रक्तदानाचा हट्ट सोडला. उच्च रक्तदाब असताना आम्ही थोडा वेळ थांबतो, रक्तदाब कमी नाॅर्मलला येईल, असे म्हणून अर्धा तास थांबले. मात्र, रक्तदाब कमी न आल्यामुळे ३७ जणांना रक्तदान करता आले नाही.
तरुणाईचा लक्षणीय सहभाग
रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा सहभाग अधिक दिसून आला. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून ही तरुणाई सहभागी झाली. एकूण रक्तदात्यांपैकी २० ते ३० वयोगटांतील २९ रक्तदात्यांचा समावेश होता. ३१ ते ४० वयोगटातील २४, तर ४१ ते ५० वयोगटांतील ३० रक्तदाते होते. या वेळी ५१ ते ६० वयोगटांतील १६ आणि ६३ वर्षीय अतुल देशपांडे यांनीही रक्तदान केले. पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्या तरुणांची संख्याही अधिक होती.
दैनिक प्रभातकडून जनजागृती
रक्तदानाबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. अनेकदा भीतीपोटी सर्वसामान्य नागरिकांसह तरुणवर्ग रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाही. मात्र, ही भीती दूर व्हावी, रक्तदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे दान नाही, याबाबत दैनिक ‘प्रभात’कडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. सर्व स्तरांतून नागरिकांशी संवाद साधून रक्तदान का करावे, यासाठी आवाहन करण्यात आले.
मंगेशकर रक्तपेढीचे सहकार्य
दैनिक ‘प्रभात’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. त्यामध्ये १०० रक्त बाटल्यांचे संकलन झाले. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने दैनिक ‘प्रभात’ला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी दैनिक ‘प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक रविकुमार इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, व्यवस्थापक प्रवीण थूल, मुख्य लेखाधिकारी अशोक जोशी, ब्लड ट्रान्सफ्युजन अधिकारी डॉ. विष्णु फुगाडे, जनसंपर्क अधिकारी रुपाली बांदल यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची टीम उपस्थित होती.