पुणे – जाहीरनामा शहर विकासाचा पाया ठरेल

मोहन जोशी : चौकीदार, रिक्षाचालकांच्या हस्ते प्रकाशन

पुणे – शहरातील प्रत्येक घरातील एका तरूणाला रोजगार, महिला स्वालंबन आणि संपूर्ण मतदार संघात मोफत अभ्यासिकेसह पर्यावरणपूरक शहर निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. सर्वसमावेशकता आणि शहराचा चौफेर विकास हेच माझे ध्येय आहे. ज्या गोष्टी करता येतील, त्याच गोष्टीचे आश्‍वासन देत आहे. त्यामुळे हा “फेकूनामा’ नसून पुण्याच्या भवितव्याचा वेध घेणारा महाआघाडीचा जाहीरनामा आहे. त्यामुळे हा जाहीरनामा शहराच्या विकासाचा पाया ठरेल, असे प्रतिपादन आघाडीचे  उमेदवार मोहन जोशी यांनी मंगळवारी केले.

आघाडीतर्फे पुणे शहराच्या जाहीरनाम्याचे मंगळवारी समता भूमी, महात्मा फुले वाड्यात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, चौकीदार, रिक्षाचालक, तृतीयपंथी, प्रथम मतदार, स्वच्छता क्षेत्र अशा सामान्य पुणेकरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
यावेळी विधान परिषदेतील पक्षनेते शरद रणपिसे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रवीण गायकवाड, नगरसेवक अजित दरेकर, वीरेंद्र किराड ,शांताराम कुंजीर, कमल व्यवहारे, नगरसेविका वैशाली मराठे, संजय बालगुडे, रवींद्र माळवदकर, डॉ. सतीश देसाई, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, नीता रजपूत, नरेंद्र व्यवहारे आदी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, मागील पाच वर्षांत देशात जातीयवादाने थैमान घातले आहे. त्यामुळे पुण्यात समता आणि एकात्मता टिकून रहावी यासाठी समता भूमीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करीत आहोत. जाहिरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता झाली की नाही याची माहिती दर वर्षी समता भूमीत येऊन पुणेकरांना देईन.

भाजपच्या पायाखालची वाळू सरकत आहे – पृथ्वीराज चव्हाण

पुण्यातील वातावरण मोहन जोशी यांना अनुकूल असून भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. हे वातावरण संपूर्ण देशात असून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.

मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ शिवदर्शन येथील साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहात आयोजित नागरिकांच्या मेळाव्याला चव्हाण उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, प्रवीण गायकवाड, रोहित टिळक आदी उपस्थित होते.

माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी देवून सर्वसामान्यांचा आदर केला आहे. मी नाही तर तुमच्यातील प्रत्येकजण निवडणुकीसाठी उभा आहे असे समजून काम करा. मोदी सरकारने पाच वर्षात काहीच काम केले नाही. मी माझ्या वचननाम्यात जी आश्वासने दिली आहेत. त्याची पूर्तता काय झाली हे दरवर्षी समता भूमी येथे जाऊन सांगणार असल्याचे जोशी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.