पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि पोलिसांंनी एकत्रित आराखडा तयार करावा. महत्त्वाच्या कामांसाठी आगामी अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
अर्थमंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर पवार यांनी पुण्यात प्रशासकीय विभागांची बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या प्रकल्पांचा तसेच वाहतूक कोंडीचा आढावाही त्यांनी घेतला. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस, महामेट्रो, पीएमपी प्रशासनाने एकत्रितपणे आराखडा करावा.
रस्त्यांची रखडलेली कामे, खड्डे, रुंदीकरण यात प्राधान्यक्रम ठरवत तातडीने कामे करावीत. त्यासाठी महापालिकेने आवश्यक ती तरतूद पुढील अंदाजपत्रकात करावी, तसेच प्राधान्याने किरकोळ कामे न करता वाहतूक सुरळीत होण्यासाठीची मोठी कामे करावीत असेही ते म्हणाले.
दरम्यान, शहराची हद्दवाढ आणि उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आहेत. त्यामुळे समाविष्ट गावांच्या कराबाबत शासनाने दिलेली स्थगिती उठवण्याची मागणी मनपा अधिकाऱ्यांनी केली. यावेळी पवार यांनी महापालिकेने एकाच वेळी कर आकारणी केल्याबाबत विचारणा केली. यावेळी या गावांंना दरवर्षी २० टक्के वाढ केली असून पाच वर्षांनंतर १०० टक्के कर आकारणी केल्याचे स्पष्ट केले.
यावर याबाबत मुंबईत बैठक पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. यावेळी महापालिकेकडून शासन पालिकेस जुन्या हद्दी प्रमाणेच जीएसटी अनुदान देत आहे. त्यामुळे शासनाने शहराची लोकसंख्या आणि महापालिकेच्या हद्दवाढीचा विचार करून अनुदान वाढवून मिळावे, अशी मागणीही अधिकाऱ्यांनी केली.