देशभरात लस पोहोचवण्याची युद्धपातळीवर तयारी
पुणे – देशभरात लस पोहोचवण्यासाठी पुणे हे मुख्य केंद्र असणार आहे. तेथूनच अन्य ठिकाणी लसीचे वितरण केले जाणार आहे. पुणे विभागातील शीतगृहांमध्ये एकावेळी सुमारे 25 ते 27 लाख लसींची साठवण करण्याची क्षमता आहे.
केंद्र सरकारने सीरमच्या “कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या “कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या लसीची साठवणूक औंध, ताडीवाला रस्त्यावर कुटुंब कल्याण विभागाच्या शेजारी एक संपूर्ण मजला याठिकाणी करून ते सगळीकडे पाठवण्यात येणार आहे. या दोन लसी पुणे हे मुख्य केंद्र ठेवून, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता ही शहरे दुसऱ्या क्रमांकाची केंद्र असणार आहेत. तेथून अन्य भागांमध्ये लस वितरणाचे जाळे निर्माण केले जाणार आहे. अशाप्रकारे देशातील सर्व राज्यांमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून सर्व शहरे आणि खेडोपाड्यांवर लस पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या क्रमांकाच्या केंद्रांमध्ये लस विमानाने पाठवली जाणार असून, लसींची वाहतूक करण्याची जबाबदारी “एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड’ या कंपनीकडे देण्यात आली आहे. एअरपोर्ट ऍथॉरिटी आणि लष्कराच्या हवाईदलाच्या नियमानुसार सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच ही वाहतूक करणे सोयीचे जाणार आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे.
अशी असेल यंत्रणा
ताडीवाला रस्त्यावरील कुटुंब कल्याण विभागाच्या कार्यालयाशेजारी असलेले एक मजल्याचे कोल्डस्टोरेज आणि औंध येथे असलेले कोल्डस्टोरेज याचा वापर केला जाणार आहे. या साठवणूक केंद्रातून लस विमानाने अन्य राज्यांतील केंद्रांशिवाय महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रात शीतकरण व्यवस्था असलेल्या व्हॅनने नेण्यात येणार आहे. त्यानंतर ती प्राथमिक आरोग्य केंद्रात वितरित करून ती लसीकरण केंद्र आणि बुथवर नेण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरही स्टोरेजची सुविधा करण्यात आली आहे.
लसींसाठी विभागातील शीतकरणाची व्यवस्था
विभागातील पुण्यासह, सोलापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये तब्बल 27 लाख करोना प्रतिबंधक लसीचे डोस साठवण्याची क्षमता असणारी शीतकरण सुविधा आहे. यामध्ये लसीकरण स्टोअर, फ्रीज यांचा समावेश आहे.
लसीकरण करताना ती लस साठवण्यासाठी शीतकरण केंद्राची सुविधा हवी असते. ती पुण्यासह जिल्ह्यात योग्य प्रमाणात उपलब्ध आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या औंध विभागात 10 लाख डोस मावतील एवढे स्टोरेज आहे. औंध येथील शीतकरण केंद्रात 10 बाय 10 फूट क्षेत्राचे “वॉकिन कुलर’ असून, त्याचे तापमान 2 ते 8 अंश सेल्सिअस इतके नियंत्रित केलेले आहे. यामध्ये दहा लाख डोस मावतात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या लसीकरण स्टोअर मध्ये आइस लाइन्ड रेफ्रिजरेटर (आयएलआर) आहेत; ज्यात अन्य नियमित दिल्या जाणाऱ्या लसी ठेवल्या जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.