नारायणगाव – येथील उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बनावट मद्याचा साठा जप्त केला असून या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 9लाख 14हजार 432 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव येथील उत्पादन शुल्कचे अधिकारी अर्जुन पवार यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंचर येथून बनावट मद्यसाठा येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंचमी हाॅटेलच्या मागे एक गाडी उभी होती. या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये 14 देशी दारूचे व एक व्हिस्कीचे बाॅक्स आढळून आले.
या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही बनावट दारु काळेवाडी (ता. हवेली) येथे बनविण्यात येत असल्याचे सांगितले. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून बनावट दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.