पुणे – तापमानवाढीत सांभाळा स्वत:चे आरोग्य

जिल्हाभरात गंभीर आजार उद्‌भवण्याची भीती : जिल्हा परिषदेकडून जनजागृती सुरू, औषधांचाही साठा

पुणे – उन्हाचा पारा वाढल्यामुळे पुणे जिल्हा चांगलाच तापला आहे. परंतू, वाढते तापमान उष्माघातासारखे गंभीर आजार उद्‌भवण्याची भीती असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. उष्माघातापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुरेसे पाणी प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, थंड पेय टाळावे, दुपारच्यावेळी घराबाहेर जावू नये, अशक्तपणा किंवा चक्कर येत असल्यास त्वरीत डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

दुष्काळ परिस्थितीमुळे जिल्ह्यात शेतजमिनी मोकळ्या झाल्या आहेत. मात्र, शेतात गवत उगवू नये, पुढचे पीक घेण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांची कामे सुरू आहेत. परंतू, वाढत्या उन्हामुळे ही कामे आजाराला निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी 11.30 ते 4 वाजेपर्यंत शेतात काम करू नये, घराबाहेर पडताना डोक्‍यावर टोपी घालावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उष्माघाताच्या संभाव्य धोक्‍याबाबत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने गावांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

सावलीचा सहारा आणि उष्माघातापासून निवारा’ असे ब्रीदवाक्‍य जिल्हा परिषदेचे आहे. तसेच उन्हाळ्यात काय करावे, काय काय करू नये, याबाबतची माहिती सांगणाऱ्या भित्तीपत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. उन्हाळ्यातील संभाव्य आजारांबाबतच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचे 1077 आणि 108 असे दोन क्रमांक आहेत. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास आरोग्य विभागाची मदत त्वरीत मिळू शकेल, असेही डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना उन्हाळ्यातील संभाव्य आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे. सर्व आरोग्य केंद्रांना यासाठीच्या आवश्‍यक गोळ्या-औषधांचाही पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी सौम्य रंगाचे, सैल आणि सुती कपडे घालावे, घर नेहमी थंड राहिल याची काळजी घ्यावी. अशक्तपणा येऊ नये यासाठी ओआरएस पावडर, लस्सी, लिंबूपाणी, ताक हे पेय प्यावेत. तर मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय पिणे टाळावे.
– डॉ. दिलीप माने, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.