पुणे, -महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली असून, अनेक प्रस्थापितांना यातून धक्के बसले आहेत तर उपनगरांमध्ये “महिलाराज’ येणार असल्याचे या सोडतीतून दिसून येते.
मंगळवारी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी याची प्रस्तावना केली. महापालिका निवडणूक अधिकारी आणि उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी कोणत्या जागांसाठी सोडत आहे आणि सोडतीच्या नियमांची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते.
सोडतीला सुरुवात झाल्यानंतर चिठ्ठ्या काढण्यासाठी शालेय मुलांना बोलावण्यात आले होते. सुरुवातीला अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती आणि त्यानंतर सर्वसाधारण महिला गटाचा चिठ्ठ्यांद्वारे फैसला करण्यात आला. त्यात अनुसूचित जमातीची चिठ्ठी काढण्यात आली नाही. नियमानुसार थेट पद्धतीने आरक्षण दिले.
अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची प्रभागातील टक्केवारी लक्षात घेऊन 23 प्रभाग त्यासाठी आरक्षित केले होते. त्यातील 12 प्रभागातील प्रत्येकी एक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली, तर अनुसूचित जमातींसाठी प्रभाग 1 आणि 14 या दोन प्रभागांतील एक जागेचे आरक्षण ठेवण्यात आले होते, त्यातही प्रभाग एक मधील “अ’ ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने “ब’ जागा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाली. त्यामुळे त्याची चिठ्ठी काढण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.
यामुळे प्रभाग 14 मधील अनुसूचित जमातीतील जागा पुरुष/महिला अशी दोघांसाठीही खुली झाली आहे. याशिवाय 148 सर्वसाधारण जागांपैकी 74 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यातील 57 जागा थेट पद्धतीने प्रत्येक प्रभागात खुल्या गटात आरक्षित करण्यात आल्या. त्यातील 57 जागा थेट पद्धतीने प्रत्येक प्रभागात खुल्या गटात आरक्षित करण्यात आल्या. मात्र उरलेल्या 33 प्रभागांतील 17 जागा या खुल्या/सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यासाठी लॉटरी काढण्यात आली.
अनेक ठिकाणी विद्यमान आमने-सामने
अनेक ठिकाणी प्रभागात दोन महिला आरक्षणे पडली असल्याने तिसरी जागा “ओपन’ राहिली आहे. त्यामध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांना आमने-सामने लढण्यासाठी उभे राहावे लागणार आहे. महिला आरक्षणात एक जातनिहाय आरक्षण आणि एक सर्वसाधारण महिला असे आरक्षण असल्याने तिसऱ्या जागी साहजिकच पुरुषांना तिकीट मिळेल. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही असे झाल्याने विद्यमान नगरसेवक आमने-सामने शड्डू ठोकून उभे राहणार आहेत. तर मागील टर्ममध्ये आरक्षणामुळेच ज्यांचा पत्ता कट झाला होता त्यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे.