तीनही पक्षांची एकही बैठक नाही ; पदाधिकाऱ्यांना मिळेना वेळ
पुणे – कसबा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार जाहीर होण्याआधीच भाजपकडून मेळावे, बैठका आणि पक्षाच्या राजकीय समितीने प्रचाराला सुरूवात केली आहे. तर, महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची अद्याप एकही अधिकृत बैठक अथवा निवडणुकीच्या रणनितीसाठी साधी चर्चाही झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच महाविकास आघाडीने ही निवडणूक सोडल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीत कसबा विधानसभेची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली असली, तरी दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटानेही या जागेवर दावा केल्याचे स्थानिक पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे, या जागेवरून आता कॉंग्रेस आणि शिवसेनेतच जुंपण्याची चिन्हे असून, त्याचा फायदा भाजपला होण्याचे चित्र आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरला गेले असल्याने शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्याची अधिसूचना दि.31 जानेवारी रोजी काढली जाणार असून 7 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत दोन मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रचारसाठी प्रभागही वाटून देण्यात आले आहेत. शिवाय उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी पक्ष घराघरांत पोहचविण्यासाठी 1 लाख पत्रके पक्षाकडून वाटण्यात येणार आहेत.
असे असतानाच महाविकास आघाडी मात्र या निवडणुकीत आहे, की नाही याबाबत आता शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे भाजपविरोधात या तिन्ही पक्षांची रणनिती काय असेल, हेदेखील सध्या गुलदस्त्यात आहे.
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढावे अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप स्थानिक पातळीवर आमची एकही बैठक झालेली नाही. कॉंग्रेसकडून नियोजन अथवा उमेदवारीबाबत आम्हाला अद्याप काहीच कळविण्यात आलेले नाही.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
पक्षश्रेष्ठींनी पिंपरी-चिंचवडची जागा मागितली आहे. त्यामुळे शिवसेना पुण्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. त्यामुळे कसबा कॉंग्रेसकडे जाणार हे आमच्यासाठी स्पष्ट आहे. मात्र, अद्याप आम्हाला कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादीकडून चर्चा अथवा बैठकीसाठी कोणतेही निमत्रंण आलेले नाही.
– गजानन थरकुडे, शहर प्रमुख शिवसेना
स्थानिक पातळीवरआघाडीच्या हालचाली थंड
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्याची जागा आघाडीत कॉंग्रेसकडे होती. त्यामुळे निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादीने महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असून ही जागा कॉंग्रेसकडे असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कॉंग्रेसचा उमेदवार 4 फेब्रुवारीला जाहीर करण्याची घोषणा केली. मात्र, त्याच वेळी महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेकडूनही निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर भाजपला कसब्यात रोखण्यासाठी या तीनही पक्षांची एकत्र बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, अशी कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी खरंच कसबा निवडणुकीबाबत गंभीर आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.