जीन्स, टी-शर्ट घालाल तर खबरदार

स्लिपर, गडद रंगाचे कपडे घालण्यासही मनाई : पालिका कर्मचाऱ्यांना गणेवेषासाठी नियमवाली

 

पुणे – महापालिकेचे कर्मचारी आणि वेगवेगळया विभागात कार्यरत कंत्राटी, ठेकेदरांकडील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास मनाई केली आहे. याशिवाय, पायात सॅंडल किंवा बूट वापरणेच बंधनकारक करण्यात आले असून स्लीपर घालण्यासही मनाई केली आहे. महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्यशासनाने याबाबतचे आदेश नुकतेच काढले असून त्यानंतर पालिकेनेही याबाबतचे आदेश काढले आहेत.

महापालिकेत दैनंदिन कामाकाजासाठी शहरातील नागरिक, उच्च पदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी, खासगी संस्था, अस्थापनांचे प्रतिनिधी, भेट देत असतात. यावेळी महापालिकेचे कर्मचारी अधिकारी पालिकेचे प्रतिनिधी म्हणून संबंधितांशी भेटतात. अशावेळी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांची छाप पडत असते. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी वेशभूषेबाबत जागरूक राहणे आवश्‍यक असल्याचे सांगत ही नवीन नियमवाली जाहीर करण्यात आली आहे.

 

…अशी आहे नियमवाली

  • दैनंदिन पेहराव शासकीय कर्मचारी पदाला शोभणारा असवा
  • पुरूष कर्मचाऱ्यांनी पॅन्ट, शर्ट, ट्राऊझर असा पेहराव करावा
  • जीन्स, टी-शर्ट, नक्षीकाम, गडद रंगाचे कपडे घालू नयेत
  • खादीला प्राधान्य देण्यासाठी आठवड्यातून एकदा शुक्रवारी खादीचे कपडे घालावेत
  • महिला व पुरूष कर्मचाऱ्यांनी बूट, सॅंडल, चप्पल वापरावी, स्लिपर घालू नये
  • महिला कर्मचाऱ्यांनी साडी, चूडीदार, सलवार घालावे
  • महिला कर्मचाऱ्यांनी ट्राऊझर पॅंट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट घातल्यास आवश्‍यकता असल्यास दुप्पटा वापरावा

आयुक्‍तांकडून कान उघडणी

गेल्या काही दिवसांत कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट घालून आलेल्या काही कर्मचाऱ्यांना थेट महापालिका आयुक्‍तांनीच फैलावर घेतले आहे. आयुक्‍त कार्यालयात काही कामानिमित्त गेलेल्या तसेच विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जीन्स घालून आलेल्या काही अधिकाऱ्यांवरही आयुक्‍तांनी गणवेशावरून कानउघडणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.