कोंढवा – हडपसर विधानसभा मतदारसंघातील वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार महादेव बाबर यांनी हडपसर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व निष्ठावंत शिवसैनिक गंगाधर बधे यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे मतदार व शिवसैनिकांना पत्राद्वारे आवाहन केले आहे.
या पत्रात महादेव बाबर म्हणतात की. हडपसर मतदारसंघांमध्ये आपण जी मला ताकद दिली, माझ्यावर प्रेम केले, विजयी उमेदवार म्हणून माझी चर्चा केली. यामध्येच मी धन्य झालो. महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने, कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते गंगाधर बधे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद देण्याचे मी ठरवले.
२००९-२०१४ दरम्यान आमदार असताना घोरपडी, मांजरी रेल्वे उड्डाणपूल, मांजरीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची पेयजल योजना असे प्रश्न सोडवण्याची पायाभरणी केली. विविध प्रश्नांसाठी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले, त्या आंदोलनांना यश येऊन अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे मतदारांच्या हृदयात माझे नाव आहे, याचे समाधान आहे.
त्यासोबत ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली त्यांच्या राजकीय व वैयिक्तिक विकासासाठी मी सदैव प्रयत्न केले आहे, यापुढे ही करणार आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत पराभूत झाल्यानंतरही मतदारांशी मी संपर्क कमी केलेला नाही. मतदारांची केलेली प्रामाणिक सेवा, त्यांच्या सुख-दुःखात नेहमी धावून गेलो आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हे सर्व जाती धर्मातील मतदारांना सोबत घेऊन विकासाचा जगन्नाथा रथ ओढणरे उमेदवार आहेत. कोणत्याही राजकीय पदावर नसताना बधे यांनी गरीब कष्टकरी सार्वजनिक हिताची कामे केली आहेत. अशा सच्चा सामाजिक कार्यकर्ता असलेले अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना त्यांच्या एअर कंडिशनर चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने निवडून द्यावे, अशी मी आपणास हात जोडून विनंती करीत आहे.