पुणे – रत्नागिरी हापूसची तुरळक आवक

पुणे – नागरिक अतुरतेने ज्या रत्नागिरी हापूसची वाट पाहात असतात. त्या हापूसची मार्केट यार्डातील फळ विभागात तुरळक आवक सुरू आहे. रविवारी येथील फळबाजारात सुमारे 100 ते 110 पेट्या हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झाला. त्याच्या 4 ते 8 डझनाच्या पेटीस 2 हजार 500 ते 4 हजार 500 रुपये भाव मिळाला. यंदा वेळेत हंगाम सुरू झाला असून गेल्या महिनाभरापासून हापूसला मिळत असलेला भाव टिकून आहे.

पोषक वातावरणामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन चांगले होणार आहे. मार्च अखेरपासून हापूसची आवक सुरळीत सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला आंब्याला चांगला भाव मिळेल. त्यानंतर आवक वाढून भाव आवाक्‍यात येतील.

– रवींद्र शहा, व्यापारी

आवक वाढणार
व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, दरवर्षी जानेवारी महिन्यात रत्नागिरी हापूस दाखल होत असतो. यंदा मात्र नोव्हेंबरपासूनच त्याची आवक सुरू झाली आहे. सुरवातीच्या काळात 2 डझनाच्या एका पेटीस जवळपास 2 हजार 100 रुपये भाव मिळाला. गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ होत असल्याने आवकेत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे भावात किंचितशी घट झाली आहे. सध्यस्थितीत रत्नागिरीतील पावस, राजापूर, आंबेशेत तसेच गणपतीपुळे परिसरातून हापूस बाजारात दाखल होत आहे. त्याला शहरासह अहमदनगर, औरंगाबाद येथून मागणी होत आहे. येत्या दहा दिवसांत हापूसच्या आवकेत दुपटीने वाढ होईल. त्यानंतर मागणीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.