सहायक आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती
पुणे – “जम्बो रुग्णालय’ बंद करण्यात आल्याने या रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेची तपासणी केली जात असून त्याचे आवश्यकतेनुसार फेरवाटप करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तसेच फेरवाटपाचा आढावा घेण्यासाठी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर जम्बो रुग्णालय सुरू करण्यात आले होते. परिस्थितीचा आढावा घेत हे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा करोना आढावा बैठकीत घेण्यात आला होता. यानुसार येथील साहित्याचे वाटप करण्यासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय वस्तूंची मोजणी करून त्यातील किती यंत्रणा चालू आहेत, काय दुरुस्त करावे लागेल यावर काम सुरू आहे.
जम्बो हॉस्पिटलमधील जी उपकरणे महापालिकेला हवी आहेत, त्याची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाला सुपूर्द करण्यात येईल. उर्वरित साहित्य ग्रामीण भागांतील आरोग्य केंद्रांना देण्यात येईल.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका