पुणे – योजना शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या साक्षरता वर्गांची तपासणी राज्य स्तरावरुन करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, शाळा तपासणीचे वेळापत्रकही ठरविण्यात आलेले आहेत.
भेटीदरम्यान संबंधित अधिकारी योजना शिक्षणाधिकारी योजना कार्यालय, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, शाळा तसेच उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू असलेले वर्ग यांना भेटी देवून असाक्षर व स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करतील. शाळांमधून विविध शासकीय योजनांची सुरु असलेल्या अमलबजावणीची पाहणी करून माहिती घेतील. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था, शाळांना भेटी देऊन तेथे सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करून माहिती घेणार आहेत.
योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर हे ५ ते २६ डिसेंबर या कालावधीत कोल्हापुर, पुणे, लातूर, नाशिक, मुंबई, अमरावती, नागपूर या विभागांना भेटी देणार आहेत. अन्य अधिकारी यांची पथके विभागनिहाय २ ते १३ डिसेंबर या कालावधीत शाळा तपासणी करणार आहेत.