पुणे – अल्पवयीन तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी सुनावली. तो आरोपी पीडितेच्या ओळखीचा होता. ती त्याला चाचा म्हणायची. या विश्वासाला तडा घालवून त्याने तिच्यावर अत्याचार केला आहे. त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला आहे. छबी मोहन सोनी (वय 25, रा. किरकटवाडी, मूळ. उत्तरप्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत किरकटवाडी येथे हा प्रकार घडला. याबाबत पीडितेच्या आईने हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे. विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी या प्रकरणात आठ साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचित यांनी काम पाहिले. तर न्यायालयीन कामासाठी हवालदार सचिन अडसुळ आणि नाईक किरण बरकाले यांनी मदत केली.
पीडित आठ वर्षांपूर्वी खानावळीचा डबा देत असल्याने सोनी तिच्या ओळखीचा होता. जास्तच ओळख निर्माण झाल्यानंतर पीडित, तिची आई, भाऊ आणि सोनी एकाच खोलीत राहत होते. रेशन, घरफाडे भरण्यास तो मदत करत असत. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास आईला मारून टाकण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे याबाबत पीडितेने कोणाला सांगितले नाही.
पीडित गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.