पुणे – चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने मानेवर वार करून पत्नीचा खून करणाऱ्याला पतीला जनठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश रुबी मालवणकर यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.
श्रीकांत कमाल चव्हाण (वय 27, रा. कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी संगीता हिचा खून केला होता. याबाबत संगीताची आई ताराबाई राठोड यांनी वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादींची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला.
सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ए.एस.गायकवाड आणि पवार यांनी मदत केली. ही घटना 31 मार्च 2019 रोजी घडली.