पुणे (प्रतिनिधी) – भांडणे करून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेलेल्या जावयाचा भोकसून खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात जावयासोबत असलेल्या मित्रालाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
सुनील नारायण वाघमारे (वय 49, रा. बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. संजय प्रेमानंद देढे (वय 27, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनेत जखमी झालेला मित्र नितेश दीपक कांबळे (वय 24, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने बिबवेवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी 12 साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलीस हवालदार संजय पुणेकर यांनी मदत केली.
23 एप्रिल 2015 रोजी रात्री दहाच्या सुमारास बिबवेवाडी येथील संघर्ष मित्र मंडळ चौक येथे ही घटना घडली. दुपारी घरी जेवायला गेल्यानंतर रात्रीचा शिळा भात खायला दिल्याने संजय चिडला होता. या कारणाने झालेल्या भांडणावरून त्याची पत्नी नेहा (वय 21) माहेरी गेली होती. संजय मित्र नितेशसह तिला आणण्यासाठी रात्री सासुरवाडीला गेला होता. त्यावेळी सुनील चाकुने संजय याच्या पोटात, छातीवर ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केला.
फिर्यादींना मांडीवर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुनीलसह त्याची मयताची सासू लक्ष्मीबाई, मेहुणा शिवम आणि मयताची पत्नी नेहा हिच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने सासरा सुनील याला खूनाच्या कलमानुसार जन्मठेप आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्नच्या कलमानुसार पाच वर्षे सक्तममजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.