पुणे – वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यां विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम आखली आहे. शहरातील वाढते अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली आहे. मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येत आहे.
गेल्या चार महिन्यांत मद्य पिऊन अडीच हजार वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, ५०० जणांचे वाहतूक परवाने रद्द करण्यात यावेत, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनंतर गेल्या महिन्यांपासून शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचे वाहन जप्त केले जाणार आहे.
“मद्य पिऊन भरधाव वाहने चालविण्यात येतात. बहुतांश अपघात भरधाव वेग, तसेच वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होतात. वाहनाचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू राहणार आहे. पहिल्या टप्यात ५०० वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला आहे.” – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा