पुणे – 24 तासांच्या खोळंब्यानंतर लायसन्स सेवा पूर्ववत

पुणे – वारंवार तांत्रिक अडचणींना तोंड देणाऱ्या आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाचा पुन्हा एकदा तब्बल 24 तासांसाठी खोळंबा झाला. यात प्रामुख्याने संगणकीय यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने राज्यभरातील शिकाऊ वाहन चालक परवान्यांची यंत्रणा दि. 9 रोजी पूर्ववत झाली.

नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर येथे (एनआयसी) झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयांना फटका बसला. परिणामी दि.8 रोजी एकाही वाहन परवान्याचे काम होऊ शकले नाही. मात्र एनआयसीने बिघाड दूर केल्याने दि. 9 रोजी सकाळपासून कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झाले. दरम्यान, ही यंत्रणा ठप्प झाल्याने राज्यातील सुमारे पाच हजार नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. संपूर्ण राज्यात याकालावधीमध्ये शिकाऊ परवाना मिळू शकला नाही. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात उमेदवारांनी शिकाऊ वाहन परवान्याच्या परीक्षेसाठी गर्दी केली होती. मात्र बिघाडामुळे नागरिकांना वाट पाहूनही परीक्षा देता आली नाही.

गुरूवारी सकाळपासूनच शिकाऊ वाहन चालन परवाना विभागातील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. नागरिक दिलेल्या वेळेनुसार ऑनलाइन परीक्षा देत होते. दि. 9 रोजी सुमारे 400 नागरिकांची शिकाऊ वाहन चालन परवान्यासाठीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्याचबरोबर ज्या नागरिकांना तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना येत्या आठ दिवसांत आरटीओच्या कामकाजाच्या वेळेत त्यांच्या सोयीप्रमाणे येऊन परीक्षा देता येणार आहे.
– संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.