मावळ: मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात आज, शुक्रवार (दि.७) रोजी बिबट्याचा वावर आढळून आला आहे. पवना धरणाच्या बाजूला असलेल्या आंबेगाव हद्दीत शुक्रवारी सकाळी बिबट्या आढळून आला. एका उंबराच्या झाडावर हा बिबट्या बसलेला असून तत्पूर्वी या बिबट्याने दोन ग्रामस्थांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
पर्यटकांची रेलचेल असणाऱ्या या भागात बिबट्या असल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांसह तिथे असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस विभागेच पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
सध्या बिबट्या एका झाडावर बसलेला असून त्याला सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी शांतता राखावी व प्रशासनास सहकार्य करावे, कुणीही बिबट्या जवळ जाऊ नये, असे आवाहनही केले आहे.