पुणे – येथील लष्करी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी लेफ्टनंट कर्नल महिला आली होती. काही दिवसांपूर्वी तिने आत्महत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणात एका ब्रिगेडिअरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेचे अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या आत्महत्येप्रकरणी वानवडी पोलिसांनी बिग्रेडियर अजित मिलू (सध्या रा. बिग्रेडियर जनरल स्टाफ, हेड क्वॉटर्स, आर्मी ट्रेनिंग कमांड, सिमला) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केलेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वानवडीतील ऑफिसर मेसमध्ये
13 ऑक्टोबर रोजी घडली होती. हा प्रकार 2019 पासून 12 ऑक्टोबर 2021 दरम्यान सुरू होता. संबंधित महिलेचे पती हे जयपूर येथे लष्करी सेवेत असून, घटनेनंतर ते पुण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिला सिमला येथे कार्यरत होत्या. या काळात 2019 वरिष्ठ अधिकारी बिग्रेडियर अजित मिलू यांनी महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे वचन देऊन अनैतिक संबंध ठेवले. त्यांचे अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करुन या महिलेला ते बदनामी करण्याची धमकी देत असत.
गेल्या काही महिन्यांपासून त्या प्रशिक्षणासाठी सिमल्याहून पुण्यात आल्या होत्या. बिग्रेडियर मिलू यांच्या धमक्यांना घाबरुन त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक साळगावकर अधिक तपास करीत आहेत.