निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर
पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 13 महापालिकांच्या ओबीसी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार, पुढील शुक्रवारी (दि. 29) रोजी ही सोडत काढली जाणार आहे. तर हे आदेश देतानाच 31 मे रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमधील सर्वसाधारण महिलांचे आरक्षणही आयोगाने रद्द केले असून एससी आणि एसटीचे आरक्षण कायम ठेवले असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय मार्च – एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत फेटाळण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली होती. त्यानुसार, आयोगाकडून सुधारित आदेश काढत महापालिका निवडणुकांच्या आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढली होती.
यावेळी ओबीसींच्या जागा खुल्या गटात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीत दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासह घ्याव्यात अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आयोगाकडून या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्यात या पूर्वी काढलेले एससी आणि एसटीचे आरक्षण कायम ठेवत सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण रद्द केले आहे. तर ज्या प्रभागांमध्ये एससी आणि एसटीचे आरक्षण पडलेले नाही त्या प्रभागात अ जागा ही ओबीसी आरक्षणासाठी राखीव असणार आहे. तर काही प्रभागात ब जागा ही ओबीसी आरक्षणासाठी राखीव असणार आहे.
* असा आहे कार्यक्रम
* मंगळवार 26 जुलै – आरक्षणाची जाहिरात देणे
* शुक्रवार 29 जुलै – आरक्षणाची सोडत जाहीर करणे
* शनिवार 30 जुलै – आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे
* 30 जुलै ते 2 ऑगस्ट – प्रभागनिहाय हरकती मागविणे
* 5 ऑगस्ट – हरकती सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण
* असे असेल सभागृह
* एकूण जागा -173
* महिलांसाठी राखीव – 87
* एस.सी. प्रवर्गासाठी राखीव – 23 ( 12 महिला)
* एस.टी. प्रवर्गासाठी राखीव – 2 (1 महिला)
* ओबीसी प्रवर्ग – 47 ( 24 महिला)
* सर्वसाधारण महिला -50
* सर्वसाधारण – 51