पुणे – ससून रुग्णालयात अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे उर्फ माहिरे ( ३९, रा. नाशिक) हिचा जामीन अर्ज विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला.
ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी, तसेच अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात प्रज्ञा कांबळेला अटक करण्यात आली होती. तिच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का), अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) सह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रज्ञा कांबळेने जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्याला विशेष सरकारी वकील व प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार ललित पाटीलसोबत आरोपी प्रज्ञा कांबळे २०१४ पासून राहात असून, तिचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिने ललित पाटीलला ड्रग्ज तस्करीत मदत केली आहे.
ललितच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ भूषण पाटील हा मेफेड्रोन विक्रीतून मिळणारे पैसे प्रज्ञाच्या गरजा भागविण्यासाठी द्यायचा. ती ललित पाटीलच्या एका बँक खात्याचे सर्व व्यवहार पाहायची. तिचा साथीदार सुभाष मंडलकडून २ कोटी १४ लाख रुपये किंमतीचा एक किलो ७१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील बोंबटकर यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने प्रज्ञा कांबळेचा जामीन अर्ज नामंजूर केला.
पुणे स्थानक परिसरातील हॉटेलात मुक्काम
ललित पाटील हा न्यायालयीन कोठडीत असताना ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यावेळी आरोपी प्रज्ञा कांबळेने ललित पाटीलसोबत पुणे रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. इतकेच नव्हे, तर ललित पाटीलने मेफेड्रोन विक्रीतून मिळालेल्या पैशातून तिला भूषण पाटीलमार्फत एक चारचाकी विकत घेऊन दिली होती. प्रज्ञा कांबळे या चारचाकीचा दैनंदिन वापर करण्यासह गुन्ह्यातील इतर आरोपींनाही वापरण्यास देत होती, असे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.