अवघ्या 0.4 गुणांचा पुण्याला बसला फटका
पुणे – देशातील राहण्यायोग्य शहरात पुणे शहराचे मानांकन अवघ्या 0.4 गुणांनी घसरले आहे. त्यामुळे 2018-19 मध्ये देशात पहिल्या क्रमांकावर असलेले पुणे शहराता आता दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. देशात पहिल्या क्रमांकावर बंगळुरू महापालिकेस या स्पर्धेत 66.70 गुण मिळाले आहेत, तर पुणे महापालिकेस 66. 27 गुण मिळाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबाद शहराला 64.87 गुण मिळाले आहेत.
पुणे महापालिका या शहरांच्या स्पर्धेसाठी असलेल्या बहुतांष निकषांमध्ये अग्रेसर राहिली असून, आर्थिक निकषांमध्ये महापालिकेस कमी गुण मिळाल्याने पुण्याचे गुण कमी झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
केंद्र शासनाकडून या राहण्यायोग्य शहराच्या स्पर्धेच्या निकषांत यावर्षी काही बदल करण्यात आले होते. या वर्षी त्यात पहिल्यांदाच आर्थिक निकषांचा समावेश करण्यात आला होता. त्यात, शहरातील बॅंकिंग प्रणाली, बॅंका आणि एटीएमची संख्या, संपूर्ण वर्षात बॅंकाकडून दिले जाणारे कर्ज आणि उत्पन्नाची माहिती तसेच एकूण ग्राहकांची संख्या आणि त्यांचे व्यवहारांचे प्रमाण याबाबत माहितीचाही समावेश होता.
मात्र, शहरातील बॅंकिंग क्षेत्रास महापालिकेने वारंवार मागणी करूनही आवश्यक असलेली माहिती मिळालेली नसल्याने पालिकेस ती देता आली नाही. त्याचा काही प्रमाणात गुणांकनावर परिणाम झाल आहे. तर इतर काही निकषांमध्येही बंगळुरूने महापालिकेस मागे टाकले असून त्यात, लोकसहभागातही पालिकेस कमी गुणांकन मिळाले आहे.
प्रशासकीय कारभारात पिंपरीची बाजी
या वर्षी पहिल्यांदच केंद्राने महापालिकेच्या कामगिरीचा निर्देशांक जाहीर केला आहे. त्यात पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश आहे. त्यात 59 गुणांसह पिंपरी-चिंचवड चौथ्या, 58. 79 गुणांसह पुणे महापालिका पाचव्या क्रमांकावर आहे. प्रशासकीय कारभार या निकषासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेस 62 गुण मिळाले असून, पुणे महापालिकेस 59 गुण मिळाले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेस एकूण गुणांमध्ये अवघ्या 0.21 गुणांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुण्याला मागे टाकले आहे.