पुणे – रस्त्यावरील हॉटेल्‌समध्येही सुरक्षेचा अभाव

स्वच्छता आणि सुरक्षेचे मानंकन पाळले जात नसल्याचे पाहणीतून समोर

पुणे – स्विट मार्ट प्रमाणे शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते सुद्धा स्वच्छता आणि सुरक्षेचे मानंकन पाळत नसल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे स्वीट मार्टमधील भटारखाने सोसायटीमधील बॉम्ब असतील; तर रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे रस्त्यावरील बॉम्ब असेच म्हणावे लागेल.

पुणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये स्वीट मार्टची दुकाने असतात. हे दुकानमालक सोसायटीमध्येच एखादा फ्लॅट घेतात किंवा दुकानाच्या मागच्या बाजुला छोटे भटारखाने तयार करतात. प्रत्यक्षात या भटारखान्यात कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसते. हे गेल्या दोन दिवसांत केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यानंतर दैनिक “प्रभात’च्या टीमने शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते यांची पाहणी केली. त्यावेळी अनेक धक्‍कादायकबाबी समोर आल्या. आज शहरात रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अशा खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या असतात. काही भागांत खाऊ गल्लीचे स्वरुप आले आहे.रस्त्यावरील हातगाडीवर विकण्यात येणाऱ्या या पदार्थांबाबत स्वच्छतेची अपेक्षाच करूच शकत नाहीत. घामाने चिंब झालेला कामगार, त्याच ठिकाणी भजी अथवा वडे तळले जातात. तर एकजण त्याच ठिकाणी खाली बसून पिठ मळत असतो. हे चित्र आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. यासाठी लागणारे पाणी कुठून आणले जाते, हा सुद्धा संशयाचा मुद्दा आहे.

शहरातील कुठल्याही रस्त्यावर आपण चक्‍कर मारली तरी अशा शेकडो हातगाड्या आपल्याला पाहण्यास मिळतील. या गाड्यांना परवानगी कोण देतो. एक हातगाडी लागली की काही दिवसांत दुसरी मग तिसरी अशा प्रकारे त्यांची रांग लागते. त्यामुळे रस्ता अडतो आहे. वाहने पार्किंग करायच्या जागांवरच या गाड्या उभ्या असतात. “नो पार्किंग’मध्ये गाडी लावली म्हणून वाहतूक पोलीस कारवाई करतात, पण वाहने पार्किंग करायच्या जागेवरच या गाड्या उभ्या असतात.त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. पालिकेकडून अशा गाड्यांवर कारवाई होते पण काही दिवसांत पुन्हा या गाड्या त्याठिकाणी दिसतात.

अग्निशमन प्रतिरोधक यंत्रणाच नाही
प्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या पाहणीत बहुतांश गाड्यांवर अग्निशमन प्रतिरोधक यंत्रणा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सिलेंडरचा स्फोट किंवा आगीचा भडका उडाल्यास अनेकांना नाहक जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. छोटे हॉटेल व्यावसायिकांची सुद्धा अशीच स्थिती आहे. कुठेही अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये स्वतंत्र भटारखाना सुद्धा नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.