पुणे : पुणे शहरात किरकोळ वादातून कोयते उगारुन दहशत माजविण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. किरकोळ वादातून खडकी आणि चंदननगर भागात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. वेगवेगळ्या घटनांमध्ये टोळक्याने तरुणांना मारहाण केली. यामुळे तथाकथीत कोयता गॅंगची दहशत पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
अक्षय गायकवाड (26, रा. खडकी बाजार) याने याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मांडा उर्फ शुभम कवाळे, सॅम्युअल पाटोळे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय गायकवाड, त्याचे मित्र निलेश शिगवण, किशन ठाकूर, पप्पू तायडे, सचिन खानझोडे, सोनू डोके औंध रस्त्यावरील पडाळ वस्ती येथे गेले होते. तेथून खडकी बाजारकडे परतताना एका पानपट्टीवर तेथे सिगारेट ओढण्यासाठी थांबले होते. येथे आरोपींशी अक्षयच्या मित्रांचा वाद झाला होता. या कारणावरुन झालेल्या वादातून आरोपींनी निलेशच्या डोक्यात कोयत्याने वार केला. अक्षय याच्यावर आरोपींनी कोयत्याने वार केले.
दरम्यान, मुंढव्यातील केशवनगर भागात वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत माजविल्याची घटना घडली. याबाबत कुणाल संजय साळुंके (रा. मयुरेश्वर कॉलनी, केशवनगर, मुंढवा) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुप ढगे (23, रा. केशवनगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. कुणाल आणि आरोपी अनुप याची भांडणे झाली होती. कुणाल केशवनगर भागातील कच्छी दाबेली गाडीजवळ थांबला होता.
अनुपने कुणालला शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकावून अनुपने दहशत माजविली. तिसऱ्या एका घटनेत भारती विद्यापीठ पोलिसांनी कोयता हवेत फिरवून दहशत माजवल्याप्रकरणी तेजस महादेव खाटपे (19,रा.आंबेगाव बु) आणि इमरान शेख (रा.संतोषीमातानगर, कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी नवनाथ पवार (रा.कात्रज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी आरोपींना महिन्याभरापूर्वी दारू पिऊन आल्याने हाकलून दिले होते. याचा राग मनात धरून आरोपी त्यांच्या घराजवळ आले. कोयता हवेत फिरवून दहशत माजवली.
रिक्षा फोडून रोकड लूटली
रिक्षाची काच दगडाने फोडून कोयत्याचा धाक दाखवत रिक्षा चालकाची 3200 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरण्यात आली. ही घटना बोपोडी येथील कुंदन प्लाझा येथे घडली. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह चौघांविरुध्द खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी आकाश पांडे (26,रा.शिवाजीनगर) हे भिमाशंकर येथून देवदर्शन घेऊन रिक्षातून परतत होते. यावेळी सराईत गुन्हेगार गौरव मोरे (19,रा.पिंपळे गुरव) आणि त्याच्या तीन साथीदारांनी दगडाने रिक्षाची काच फोडली. यानंतर कोयता दाखवून त्यांच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरली. तसेच कोयते हवेत फिरवत आम्ही येथले भाई आहोत, कोणी मधे आला तर कापून टाकू, असे बोलत दहशत पसरवली.