पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरूड हे कुटुंब मानून काम करीत आहे. भविष्यातही कोथरूडसाठी समर्पित होऊन काम करणार असल्याची भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपा कोथरूड दक्षिण मंडलाच्या वतीने शुक्रवारी बावधन- कोथरूड प्रभाग क्रमांक १० मध्ये भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेदेखील सहभागी झाले होते. कोथरूडमधील किनारा हॉटेल चौक येथून रॅलीचा प्रारंभ झाला.
परमहंसनगर, टेकडी पायथा, कस्तुरी हॉटेल चौक, पौड रोड, कोथरूड पोलिस स्टेशन, श्रीराम कॉलनी, आशिष गार्डन, कुमार परिसर, सागर कॉलनी, कैलास वसाहत, साईनाथ वसाहत, पीएमसी कॉलनी, अरमान सोसायटी, भिमाले टॉवर्स मार्गे सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. त्या वेळी पाटील बोलत होते.
रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले नागरिक हात उंचावून पाठिंबा दर्शवीत होते. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी होत होती. महिला औक्षण करण्यासाठी पुढे येत होत्या. विशेष म्हणजे, तरुणांचा जल्लोष आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या वेळी भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष शिंदे, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभुणे- पाठक, बाळासाहेब टेमकर, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे, कैलास मोहोळ, बाळासाहेब खंकाळ, राजेश गायकवाड, सीताराम खाडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘‘कोथरूडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आशीर्वादामुळे बाइक रॅली अत्यंत भव्य ठरली. पाठीशी खंबीरपणे उभे असणारे कोथरूडकर, हेच माझे पाठबळ आहे. त्यांच्या प्रतिसादातून अधोरेखित होते आहे, की कोथरूडमध्ये या वेळीही कमळच फुलणार आहे.” – चंद्रकांत पाटील, महायुती उमेदवार, कोथरूड विधानसभा मतदारसंघ.