पुणे : शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली असून मंगळवारी (दि. १८) कोरेगांव पार्क येथे सर्वाधिक ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील, त्यामुळे कमाल तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली असून, उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे.
हवामानातील सततच्या बदलामुळे पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाचा चटका असा अनुभव पुणेकर घेत आहे. मात्र, हे बदलते हवामान आरोग्याच्या समस्या वाढवत आहे. गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे आज शहरातील हवेली परिसरात सर्वात कमी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
तर दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असून, कोरेगांव पार्क, राजगुरूनगर, मगरपट्टा, एनडीए, चिंचवड, शिवाजीनगर, पाषाण आणि इंदापूर परिसरातील कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे असल्याने उकाडा जाणवत होता. तसेच, मागील आठवड्यात ३० अंशाच्या खालपर्यंत असलेले कमाल तापमान आज ३२ अंशाच्या पुढे गेले.
विदर्भात हलका पाऊस
राज्यातील कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होत आहे. अकोला येथे सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भामध्ये दि. २१ आणि २२ रोजी पावसाच्या हलक्या सरी पडतील तर अन्य राज्यातील हवामान कोरडे राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.