पुणे : नागपूर-बांगलादेश बाजारपेठांना जोडणार किसान रेल्वे

कमी वेळात माल पाठवण्यास होणार मदत
नितीन गडकरी यांच्या प्रस्तावाला रेल्वेकडून “ग्रीन सिग्नल’

पुणे – विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ आहे. मात्र, थेट रेल्वेची सुविधा नसल्याने रस्ता वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागतो. “किसान रेल्वे’ सुरू झाल्यास कमी वेळात माल बाजारात उपलब्ध होईल. यासाठी विशेष किसान रेल्वे सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याबाबत लवकरच रोडमॅप देखील तयार करण्यात येणार आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ आहे. वार्षिक उत्पन्नाच्या दोन तृतीयांश सुमारे अडीच लाख टन संत्री दरवर्षी बांगलादेश येथे निर्यात होतात. मात्र बांगलादेशसाठी थेट रेल्वे सेवा नसल्याने रस्त्याने संत्र्याची वाहतूक होत असून, विदर्भातून मालवाहतूक करताना सुमारे 72 तास लागतात. त्याऐवजी किसान रेल्वे सुरू झाल्यास 36 तासांत शेतकऱ्यांचा माल बांगलादेशच्या बाजारात उपलब्ध होवू शकेल.

यामुळे निर्यातीच्या खर्चामध्ये कपात होईल आणि मालाची गुणवत्ता चांगली राहण्यास मदत होणार आहे. यासाठी “विशेष किसान रेल्वे’ सुरू करण्यासाठी गडकरी यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक सोमेश कुमार यासह रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या प्रस्तावाला रेल्वे विभागानेदेखील “ग्रीन सिग्नल’ दाखविला असून, लवकरच याचा रोडमॅप तयार करण्यात येईल, असे आश्‍वासन बैठकीत सोमेश कुमार यांनी दिले.

वीस बोग्यांची विशेष किसान रेल्वे

विशेष किसान रेल्वे सुमारे वीस बोग्यांची असून, यामध्ये 460 टन माल वाहन नेण्याची क्षमता असेल. वरुड, नागपूर, काटोल, नरखेड या स्टेशनवरून शेतकरी आपला माल या गाडीमधून पाठवू शकतील. यासाठी विशेष वेबसाइट तयार करून शेतकऱ्यांनी आधीच बुकिंग घेण्याची सूचना गडकरी यांनी बैठकीत केली. बांगलादेशप्रमाणेच दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, जयपूरसारख्या महानगरांनासुद्धा या माध्यमातून माल पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.