‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’चे उपचारासाठी सहकार्य
पुणे – मूत्रपिंडाचा आजार असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्यावर औंध येथील एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मोलाची मदत केली, त्यामुळे शस्त्रक्रिया पार पडली.
डॉ. कल्पेश पाटील आणि हॉस्पिटलमधील सामाजिक कार्यकर्ते अशोक घोणे यांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यातील वैष्णव अमित मांढरे या चिमुकल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत अनेक आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहेत. तसेच विविध हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया शासकीय योजना आणि इतर निधींच्या माध्यमातून विनामूल्य होण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
अमित मांढरे म्हणाले, “वैष्णव याला जन्मापासून मूत्रपिंडाचा त्रास होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले, त्यासाठी चार ते साडेचार लाख रुपये खर्च सांगितला होता. मी सुतारकाम करत असल्याने मला तेवढा खर्च करणे शक्य नव्हते. त्यावेळी मला ट्रस्टने मोलाची मदत केली. आज माझा मुलगा सुखरुप आहे.
याशिवाय व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन आय केअर सेंटर केईएम हॉस्पिटल मध्ये चष्मा घालवण्याची शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून माफक दरात करून देण्यात आली.’ सूर्या सह्याद्री हॉस्पिटल कसबा पेठ पुणे येथे कॅन्सर रुग्णांसाठी मोफत रेडिएशनसंदर्भात अनेक रुग्णांनी शिबिरात सहभाग घेतला.