पुणे – शहरात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या खराडी, चंदननगर भागांत टँकरवाल्यांच्या भल्यासाठी या भागाला पाण्यापासून वंचित ठेवले गेले. तुम्ही महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना साथ द्या. टँकरमाफियावाल्यांना हद्दपार केल्याशिवाय मी पुन्हा मत मागायला येणार नाही, असे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
वडगाव शेरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की आमदार टिंगरे यांनी विकासकामात कोणतेही राजकारण न करता नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघात ऑक्सिजन पार्क, लोहगाव उपजिल्हा रुग्णालय, शास्त्रीनगर चौक, विश्रांतवाडीतील उड्डाणपूल अशा दीड हजार कोटींची कामे केली. मात्र, गेली ३० वर्षे हे सत्तेत होते, त्यांना पाण्याची समस्या सोडविता आली नाही. मात्र, त्यासाठी आता स्वत: सुनील टिंगरे मैदानात उतरले असून, मतदार त्यांना साथ देतील, असेही पवार म्हणाले.
महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीसह विविध कल्याणीकारी योजना राबविल्या. तुम्ही महायुतीचे सरकार निवडून द्या, पुढील पाच वर्षे या योजना सुरूच राहतील, याची हमी मी देतो, असे सांगत लोकसभेत संविधान बदलाचा खोटा प्रचार केला गेला. खोटा नरेटिव्ह पसरविला जात असल्यामुळे आता तुम्ही नीट विचार करा आणि मतदान करून आमदार सुनील टिंगरे यांना विजयी करा, असे आवाहनही पवार यांनी केले.