लस केंद्रासाठी खडाजंगी

पुणे  – प्रभागातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यात लसीकरण केंद्रास मान्यता मिळत नसल्याने तसेच अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने राग अनावर झालेल्या भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्याशी वाद घातला. हा प्रकार आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या समोरच घडल्याने विभागात मोठा गोंधळ उडाला. या प्रकारानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा देत “असे प्रकार होणार असतील तर काम करणार कसे’ असा सवाल उपस्थित करत अतिरिक्‍त आयक्‍त रूबल अग्रवाल आणि महापौरांकडे तक्रार करत नाराजी व्यक्त केली.

घोगरे हे महापालिकेत नाव समितीचे अध्यक्ष आहे. त्यांच्या प्रभागात माजी महापौर प्रशांत जगताप यांनी करोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे घोगरे यांनीही आरोग्य विभागाकडे या केंद्रासाठी प्रस्ताव दिला होता. ते आरोग्य विभागाकडे याबाबत वारंवार मागणी करत होते.

मात्र, हा प्रस्ताव मंजूर होत नसल्याने ते कार्यकर्त्यांसह बुधवारी दुपारी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्याकडे गेले. तसेच “डॉ. जाधव दुजाभाव करत असून फोन उचलत नाहीत, प्रस्तावाबाबत प्रतिसाद देत नाहीत’ अशी तक्रार केली. यावेळी डॉ. भारती यांनी डॉ. जाधव यांना आपल्या कार्यालयात बोलवले. त्यावेळी नगरसेवक घोगरे आणि डॉ. जाधव यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

अशी झाली खडाजंगी
डॉ. जाधव या आरोग्य प्रमुखांच्या कार्यालयात आल्यानंतर घोगरे यांनी “तुम्ही काय काम करता, रात्री फोन केला तर उचलला नाही. दोन दिवस फाइल पाठवून झाले. तुम्ही झोपा काढता का?’ अशा प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. त्याला डॉ. जाधव यांनीही प्रत्युत्तर दिले. “तुम्ही कामे करता, तर आम्ही काय झोपा काढत नाही. आम्ही ही डॉक्‍टर आहोत. आम्हांलाही लोकांच्या जीवाची काळजी आहे. तुमची अरेरावी ऐकून घेण्यासाठी आम्ही तुमचे नोकर नाही. तुम्ही आम्हांला पगार देत नाही. आमच्या खुर्चीवर बसून आम्ही काम करतो. पाच मिनिटे बाहेर गेलो, तरी 20 फोन येतात, प्रत्येक फोनला उत्तर कसे देणार’ असे सुनावले. त्यामुळे संतप्त झालेल्या घोगरे यांनी गोंधळ घातला.फ

 

झालेला प्रकार चुकीचा आहे. मी अधिकाऱ्यांच्या बाजूने आहे. या प्रकाराबाबत दोन्ही बाजू ऐकल्या आहेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे काम करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारे अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार योग्य नाहीत.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्‍त आयुक्‍त, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.