पहिल्याच दिवशी सुमारे 251 नागरिकांची भेट
पुणे – शहरातील राजा दिनकर केळकर संग्रहालय रविवारपासून पुन्हा खुले झाले आहे. अभ्यासक, संग्रहालयाचे कर्मचारी आणि पुणेकरांच्या उपस्थितीत झाले. करोनाच्या सुमारे 10 महिन्यांनंतर शेकडो पुणेकरांनी पहिल्याच दिवशी संग्राह्य वस्तू पुन्हा न्याहाळल्या.
करोनामुळे मार्चपासून बंद असणारे संग्रहालये, पर्यटन स्थळे प्रशासनाच्या परवानगीने सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असणारे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे रविवारी सकाळी शिल्पकला, मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे प्रवेशद्वार प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले.
संग्रहालयाचे संस्थापक डॉ. दि. गं. केळकर यांनी सन 1920 साली संग्रहालयाची पहिली वस्तू मिळवली. यासह केळकर यांच्या 126 व्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी संग्रहालय पुन्हा एकदा सुरू झाले. दरम्यान, नगारा वादन देखील करण्यात आले. यावेळी केळकर यांच्या कन्या रेखा रानडे, संचालक सुधन्वा रानडे यांसह कर्मचारी उपस्थित होते.
“रविवारी 251 नागरिक संग्रहालयात आले होते. पहिल्याच दिवशी असा प्रतिसाद मिळणे अनपेक्षित होते. यापुढील काळात देखील नागरिकांनी असाच प्रतिसाद द्यावा,’ अशी भावना संचालक रानडे यांनी व्यक्त केली.