पुणे – कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पर्वती येथील कार्तिक मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा करोना पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवले होते. त्यामुळे दर्शन न मिळाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
देवदेवेश्वर संस्थानचे पर्वती येथे पेशवेकालीन कार्तिकस्वामी मंदिर आहे. रविवारी ते सोमवारी (28 ते 29 नोव्हेंबर) कार्तिक पौर्णिमा असल्याने मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. पर्वतीवर पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचेदेखील आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा मंदिर बंद ठेवले होते. याची भाविकांना कल्पना नसल्याने शहरासह आसपासच्या भागांतून भाविक आले होते. मात्र, दर्शनासाठी पोलिसांनी न सोडल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कार्तिक पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 29 आणि 30 नोव्हेंबरदरम्यान मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतलो. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याबाबतचा फलक संस्थानाच्या वतीने पर्वती पायथा येथे लावला. परंतु, याबाबतची माहिती जाहीर केली नसल्याने भाविकांनी गर्दी केली. दरवर्षी आम्ही पर्वती येथे दर्शनासाठी येतो.
दिवाळीपासून मंदिरे खुली केल्याने यावर्षीदेखील दर्शन घेता येईल म्हणून 2 तासांचा प्रवास करून आलो. मंदिर बंद असल्याची पूर्वकल्पना असती, तर आलो नसतो. कळसाचेदेखील दर्शन पौर्णिमेला मिळाले नसल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
दरवर्षी पर्वती येथील कार्तिकस्वामी मंदिरात यात्रेचे आयोजन करण्यात येते. महिलांनादेखील मंदिरात प्रवेश देण्यात येतो. मात्र, यंदा स्थानिक प्रशासनाने आम्हाला मंदिर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंदिर बंद ठेवले होते. पौर्णिमेनिमित्त विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा आणि अन्य विधी पार पडले.
– सुधीर पंडित, प्रमुख विश्वस्त, देवदेवेश्वर संस्थान