पुणे कबड्डी लीग : पुरुषांमध्ये हवेली तर महिलांमध्ये मुळशी संघाला विजेतेपद

पुणे – चुरशीच्या लढतीत हवेली संघाने मुळशी संघावर 37-30 असा विजय मिळविला आणि पुणे कबड्डी लीग स्पर्धेतील पुरूष गटाचे विजेतेपद मिळविले. महिलांमध्ये मुळशी संघाने या पराभवाची कसर भरून काढताना बारामती संघाला 29-24 असे हरविले आणि अजिंक्‍यपदावर नाव कोरले.

शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुष विभागाच्या अंतिम सामन्यात मध्यंतराला हवेली संघाकडे 18-13 अशी आघाडी होती. सामन्याच्या प्रारंभापासूनच हवेलीच्या अक्षय जाधव व अजय भांडवलकर यांनी आक्रमक खेळ करीत आपले इरादे स्पष्ट केले होते. मुळशीचा भरवशाचा खेळाडू शुभम शेळके याच्या उत्कृष्ट पकडी घेत त्यांनी मुळशी संघावर दडपण आणले. सामना संपण्यास शेवटचे 7 मिनिटे बाकी असताना 24-24 बरोबरी झाली. त्यानंतर शुभम कुंभारने एका चढाईत दोन गुण मिळवून हवेली संघावर लोण नोंदवित मुळशी संघाला 29-24 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांना ही आघाडी टिकविता आली नाही.

त्यानंतर हवेलीच्या अजय भांडवलकर याने सुपर चढाई करीत 4 गुण मिळवित परत संघाला 34-28 आघाडी मिळवून दिली. हवेलीच्या अक्षय जाधव याने 10 गुण मिळविले.अजय भांडवलकर याने 8 गुण मिळविले, ओंकार घोडके व अक्षय नखाते यांनी प्रत्येकी 4 उत्कृष्ट पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुळशी संघाच्या शुभम कुंभार याने 10 गुण मिळविले. सचिन पाटील, किरण मगर, गणेश लोखंडे यांनी प्रत्येकी 4 गुण मिळवित कौलुकास्पद झुंज दिली. त्यांच्या प्रदिप झिरपे यानेही 3 पकडी घेत चांगला खेळ केला.

महिलांच्या अंतिम सामन्यात मुळशी संघाने पूर्वार्धात 14-11 अशी आघाडी मिळविली होती. मुळशीच्या मानसी रोडे, समृध्दी कोळेकर, ऐश्‍वर्या झाडबुके यांनी आक्रमक खेळ करीत महत्त्वाची कामगिरी केली. बारामतीच्या आदिती जाधव व प्रतीक्षा कऱ्हेकर यांनी चांगला खेळ केला. मध्यंतरानंतर बारामती संघ आक्रमण वाढविल अशी अपेक्षा होती. मात्र, मुळशी संघाच्या भक्कम बचावापुढे त्यांना आक्रमक चाली करता आल्या नाहीत. त्यातच उत्तरार्धात बारामती संघावर एक लोणही बसला.मुळशीच्या मानसी रोडेने 7 गुणांसह एक पकड करीत 8 गुण मिळविले. समृध्दी कोळेकर हिने 9 गुण वसुल केले. ऐश्‍वर्या झाडबुके हिने 3 गुणांसह एक पकड करीत 4 गुण मिळविले, तर समृध्दी मराठेने उत्कृष्ट पकडी घेत 4 गुण मिळविले .

बारामतीकडून आदिती जाधव हिने 13 गुणांसह तीन पकडी करीत अष्टपैलू खेळ केला. प्रतिक्षा कऱ्हेकर हिने 4 गुण मिळविले व नागेंद्र कुऱ्हा हिने 2 पकडी केल्या. पुरूष विभागात जुन्नर व बारामती यांना अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविला. महिलांमध्ये हा मान अनुक्रमे खेड व पिंपरी चिंचवड संघास मिळाला. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून चढाई- शुभम कुंभार, मानसी रोडे. पकडी- गोकुळ तोडकर, सिध्दी मराठे, अष्टपैलू- अक्षय जाधव , महिला- आदिती जाधव यांची निवड झाली.

पारितोषिक विलरण समारंभ विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी स्पर्धा बाबुराव चांदेरे, चेतन तुपे, ऍड.आस्वाद पाटील, सचिन भोसले, शकुंतला खटावकर, उत्तमराव माने, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे- सातव, राजेंद्र आंदेकर, आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)