पुणे : जिल्हा परिषदेने जनसुविधा अंतर्गत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले. पाटील यांनी केलेली कनिष्ठ अभियंता निलंबनाची गेल्या पंधरा दिवसांतील दुसरी कारवाई आहे.
वाघळवाडी येथे जन सुविधा अंतर्गत काम मंजूर करण्यात आले. ते काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक तसेच संपूर्ण कार्यवाही ही कनिष्ठ अभियंता म्हणून झारगड यांच्याकडे होती.
प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेता परस्पर हा बदल करून काम केले गेले. झारगड यांच्या बद्दल अनेक तक्रारी आहेत. याप्रकरणी गावकऱ्यांची तक्रार, त्याचबरोबर बारामती पंचायत समितीचे उपअभियंता यांचा अहवाल आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडून झालेली चौकशी या सर्व बाबी विचारात घेऊन झारगड यांचे तात्पुरते निलंबन करण्यात आले.
अनेकांची चौकशी सुरू
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये अनेक कनिष्ठ अभियंत्यांच्या चौकशी सुरू आहेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्या प्रलंबित ठेवून एक प्रकारे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र होते. या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर गजानन पाटील यांनी या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश प्रशासनाला देत प्रत्यक्ष कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे.