पुणे – अनेकजण सापडलेली वस्तू ज्याची आहे त्याला देऊन प्रामाणिकपणाचे उदाहरण बनत असतात. पुण्यातही एसटी बसचे कर्मचारी प्रामाणिकपणाचे उदाहरण बनले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाचे बसमध्ये गहाळ झालेले दागिने परत केल्याची घटना समोर आली आहे. नागनाथ लामकामे आणि बालाजी मेळे अशी त्या कर्मचाऱ्यांची नावे आहे. सर्व स्तरातून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट ते गुलबर्गा एसटी बस स्वारगेट येथे आली. तेव्हा वाहक नागनाथ लामकामे आणि चालक बालाजी मेळे यांना बसमध्ये चांदीचे दागिने सापडले. त्यांनी ते तत्काळ स्वारगेट स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांच्याकडे जमा केले. या दागिन्यांची किंमत सुमारे साडेसात हजार रुपये आहे. यानंतर दागिन्यांची चौकशी करत आलेल्या प्रवाशाची शहानिशा करून संबंधित व्यक्तीला दागिने परतवण्यात आले. प्रामाणिकपणाचा गौरव म्हणून स्थानकप्रमुख गोविंद जाधव यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.