संजय कडू
पुणे – जैन साधकाच्या वेषात जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. कार्तिक पोर्णिमेनिमित्ताने जैन बांधव जैन मंदिरामध्ये समारंभपूर्वक पूजाअर्चा करून समारंभ साजरा करीत असतात. त्याच दिवशी या चोऱ्या झाल्याने खळबळ माजली होती. लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेता चोरट्यास जेरबंद करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
नरेश आगरचंद जैन (रा.बॉम्बे चाळ रुम, सी.पी. टँक गिरगाव, मुंबई) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील एका गुन्हयातून नोव्हेंबर महिण्यात जामिनावर सुटला होता. तो २०१९ पासून अशा पध्दतीने जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करतो. पुणे शहरात त्याने यापुर्वी एक गुन्हा केला आहे, मात्र त्याची तक्रार दाखल झाली नव्हती. विशेष म्हणजे आरोपीने यापुर्वीही घाटकोपर वाई, चिखली, डोंबिवली इत्यादी भागात सुमारे ८ ते १० ठिकाणी अशाच पध्दतीने मंदीरांमध्ये चोऱ्या केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ नोव्हेंबर रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. घरातील जैन मंदिरात चोरी झाल्याप्रकरणी जय परेश पारेख( रा. पुनावाला गार्डनसमोर, स्वारगेट) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या घरातील जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असे चोरुन नेण्यात आले होते.
तसेच त्याच दिवशी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये व शहरातील ३ ते ४ जैन मंदिरांमधील देवाचे दागिणे चोरीचा प्रयत्न झाला होता. घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तांत्रिक विश्लेषन व सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. त्यानंतर पुणे ते मुंबई पर्यंत खबऱ्यांकडुन माहीती काढली.
तेव्हा पोलीस हवालदार सागर केकाण यांना खबर मिळाली की, अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई, डोंबिवली व इतर परिसरात घडले असुन त्यातील आरोपी सध्या मुंबईतील गिरगाव भागात राहण्यास आहे. त्यानूसार सापळा रचून आरोपीला ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्हयातील चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असे ४ लाख २० हजाराचे दागिणे जप्त करण्यात आले.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्रातील ब-याच पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर आहे. आरोपी हा मंदिरात जाताना जैन साधकांच्या वैशात जाऊन देवाचेच दागिने चोरी करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. शहरात अशा काही चोऱ्या घडल्या असल्यास स्वारगेट पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युवराज नांद्रे यांनी केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उप-निरिक्षक तानवडे स्वारगेट पो.स्टे. करत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह -आयुक्त रंजनकुमार शर्मा , अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील , पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोलीस निरिक्षक युवराज नांद्रे , उप-निरिक्षक तानवडे, अंमलदार दिनेश भांदुर्गे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सतीश कुंभार व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.