पुणे : ‘सिग्नल’ सुटण्याची वेळ झाली

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व सिग्नलवर बसविण्यात येणार “टायमर’

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सिग्नल आता टायमरमय होणार आहेत. यापूर्वी अनेक सिग्नल्सला टायमर होते. मात्र, बहुतांश ठिकाणचे टायमर बंद पडले होते, तर काही ठिकाणच्या टायमरमध्ये दोष असल्याने वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार पालिकेने अनेक चौकातील टायमर काढून टाकले होते. आता, मात्र येत्या वर्षाअखेरपर्यंत शहर व पिंपरी-चिंचवडमधील सर्वच्या सर्व 248 सिग्नलला डिजिटल टायमर बसविण्यात येणार आहेत.

शहरातील अनेक मुख्य चौकातील सिग्नलला वाहनचालकांना कमीतकमी 40 सेकंद ते जास्तीत जास्त 120 सेकंद थांबावे लागते. मात्र, बहुतांश ठिकाणी टायमरच नसल्याने वाहनचालकांना लाल सिग्नल हिरवा कधी होणार, याबाबतचा कालावधी कळू शकत नाही. परिणामी, वाहन सुरूच ठेवावे लागते. यामुळे इंधनाची नासाडी व पैशाचा चुराडा होत असून यातून प्रदूषणही वाढत आहे.

आता, मात्र प्रत्येक सिग्नलला टायमर बसणार असल्याने सिग्नलवर किती वेळ थांबावे लागणार, याबाबत कळू शकेल. पादचाऱ्यांनाही या सिग्नल टायमरचा फायदा होणार असून रस्ता सुरक्षितपणे कधी पार करता येणार आहे. यातून अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी होईल, असा विश्‍वास वाहतूक विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

डेडलाइन हुकली; अनेक सिग्नलच नादुरुस्त
सर्व सिग्नलला टायमर बसवण्याची डेडलाइन 15 सप्टेंबर होती, ती आता डिसेंबर अखेर, अशी करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील अनेक सिग्नल बंद केले गेले. परिणामी, या सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत आधी नादुरुस्त सिग्नल दुरुस्त करण्याची मोठी जबाबदारी पालिकेवर आहे, त्यानंतरच टायमर बसतील. परिणामी, डिसेंबरची नवी डेडलाइन तरी पाळली जाते का? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत सुमारे 70 सिग्नल्सवर टायमर बसविण्यात आले आहेत. करोनामुळे असणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी टायमर वेळेत बसविता आलेले नाहीत. वाहतूक शाखेकडून आम्हाला अद्याप टायमर कोठेकोठे बसवावेत, याबाबत यादी दिली गेलेली नाही. यादी आल्यानंतर प्राधान्यक्रम ठरवून टायमर बसविले जातील.
– श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.