पुणे – शिवकालीन टाक्‍यांद्वारे पाणी संकटावर मात शक्‍य

सदस्यांचे मत : जिल्हा परिषदेत पार पडली आढावा बैठक

पुणे – जिल्ह्यात शिवकालीन पाणी साठवण टाक्‍यामुळे गाव आणि तालुक्‍याला पुरेशा पाणीसाठा उपलब्ध होत आहे. ही यशस्वी उपाययोजना असून, हा उपक्रम टंचाई अंतर्गत हाती घेण्यात यावा. जेणेकरून भविष्यात पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे आणि शरद बुट्टेपाटील यांनी केली.

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणी आणि चारा टंचाई बैठकीत शिवतरे आणि बुट्टेपाटील यांनी ही मागणी केली. जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरुपी पाण्याची सोय व्हावी, पाण्यासाठीची वणवण थांबावी, यासाठी शिवकालीन टाक्‍यांप्रमाणे खडकातील टाक्‍या बांधण्याची नावीण्यपूर्ण योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. त्यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात निधीची तरतूदही करण्यात येते.

दरम्यान, जिल्ह्यात शिवकालीन टाक्‍यांमुळे उन्हाळ्यामध्येही पाणीटंचाईचा प्रश्‍न भेडसावत नाही. यावर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आणि तीव्र उन्हाळा असतानाही या टाक्‍यांमुळे काही गावातील नागरिकांना आतापर्यंत पाणीपुरवठा सुरू होता. तसेच अन्य गावांनाही या टाक्‍यांमधून पाणीपुरवठा करणे शक्‍य होते. त्यामुळे भविष्यात दुर्गम डोंगर भागातील पाणी टंचाईचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर शिवकालीन टाक्‍या बांधणे काळाची गरज आहे. त्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढेल, टॅंकरची संख्या कमी होईल आणि ऐन उन्हाळ्यातही डोंगराळ भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवळ थांबेल. त्याबाबत विश्‍वासराव देवकाते यांनी या मागणीचा पाठपुरावा करू असे सांगत जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त काम जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचे सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×