पुणे – पुण्यात वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, उच्च शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकृतरित्या लेखी पत्र अद्याप महाविद्यालयांना प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे महाविद्यालये मंगळवारपासून (दि.12) सुरू होतील, याविषयी साशकंता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी महाविद्यालये दि. 12 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मुभा दिली. त्यानंतर बहुतांश शैक्षणिक संस्थांनी आवश्यक नियोजन केले आहे. मात्र, प्रत्यक्ष महाविद्यालये उद्यापासून सुरू करावीत, याविषयी अजूनही संभ्रम आहे.
दरम्यान, उच्च शिक्षणासंदर्भात एखाद्या निर्णय जाहीर केल्यानंतर उच्च शिक्षण विभागाकडून अधिकृत पत्र प्रसिद्ध केले जाते. त्यानंतर विद्यापीठामार्फत सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध करून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जाते. अजित पवारांनी आदेश दिले असले, तरी त्यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाकडून पत्र काढण्यात आले नाही. त्यामुळे विद्यापीठही राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.
या सर्व प्रकारात महाविद्यालये सुरू करावीत का नको, अशी स्थिती शैक्षणिक संस्थांपुढे निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे महाविद्यालयांचे प्राचार्यदेखील संभ्रमात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले असून, ती स्वागतार्ह आहे. महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात प्राचार्य उत्सुक आहेत. मात्र, राज्य सरकार आणि विद्यापीठांकडून काहीच परिपत्रक प्रसिद्ध न केल्याने तांत्रिकदृष्ट्या उद्यापासून पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार नाहीत. याबाबत स्पष्टीकरणे होणे आवश्यक आहे.
नंदकुमार निकम, माजी अध्यक्ष, प्राचार्य महासंघ