पण, करोना बाधितांचे प्रमाण अधिक : आरोग्य विभागाची आकडेवारी
पुणे – करोनामुक्त होण्याचे प्रमाण पुण्यात मुंबईपेक्षा जास्त आहे, परंतु बाधितांचे प्रमाण पुण्यात अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. संपूर्ण देशात बाधितांची जी संख्या आहे त्यातील ऍक्टिव्ह केसेस 3.17 टक्के आहेत. तर महाराष्ट्रात 3.27 टक्के आहे. मुंबईमध्ये बाधितांमधील ऍक्टिव्ह केसेस 2.45 टक्के आहे तर पुण्यात मुंबईपेक्षा जास्त असून, ते प्रमाण 2.88 टक्के आहे.
देशपातळीवरील बाधितांमधील उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण हे 95.36 टक्के आहे. तर महाराष्ट्रात ते कमी म्हणजे 94.10 टक्के आहे. देश आणि राज्य पातळीपेक्षा मुंबईमध्ये उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण एक टक्क्याने कमी असून, ते 93.39 टक्के आहे. परंतु पुण्यात राज्याच्या बरोबरीने रिकव्हरी रेट असून, तो 94.52 टक्के आहे.
देशपातळीवरील एकूण मृत्युदरापेक्षा मुंबईतील मृत्युदर हा सर्वाधिक असून तो 3.87 टक्के आहे. त्या खालोखाल पुण्यातील मृत्युदर जास्त असून तो 2.60 टक्के आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा मृत्युदर 2.58 टक्के तर देशातील मृत्युदर 1.45 टक्के आहे. देशामध्ये करोनाची दुसरी मोठी लाट येणार, असे भाकित वर्तवण्यात आले होते. मात्र तसे न होता, बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण
करोनाचा प्रादुर्भाव जेव्हा सुरू झाला तेव्हा सुरूवातीला बाधितांमधील ऍक्टिव्ह केसचे प्रमाण अधिक होते, ते आता कमी झाले असल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून येत होते. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. ते आता कमी झाल्याने मृत्युदरही कमी झाल्याचे यावरून पहायला मिळते. करोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर मृत्युदर आणखी घटण्याची शक्यता असून, लसीबाबतची सर्व तयारी राज्यांनी पूर्ण केली आहे.