महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
पुणे – केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात देखील मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. विकास हाच आमचा अजेंडा असून, कोथरूड आणि पुणे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महायुतीचे कोथरूडमधील उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी संध्याकाळी झाली. त्यावेळी काढलेल्या रॅलिदरम्यान त्यांनी जास्तातजास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. समाजातील सर्व घटकांनी प्रचारादरम्यान उस्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. आतला आणि बाहेरचा या मुद्द्याचा विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी सर्वसामान्य जनतेला मात्र भाजपच्या विकासाभिमुख धोरणावर पूर्ण विश्वास आहे. सरकारच्या धोरणांच्या माध्यमातून कोथरूडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रचार सांगता दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतानाही रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सकाळी केळेवाडी येथील मंदिरात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि ताथवडे उद्यानातील नागरिकांची भेट घेतली. याशिवाय वृत्तपत्र विक्रेता मेळाव्याला संबोधित केले.