पुणे – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग प्रकरणात समर्थ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. यामुळे याप्रकरणी अटक असणाऱ्यांची संख्या चार झाली आहे. तर, त्यांच्याकडे केलेल्या तपासात आणखी एका मुख्य आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेटिंगचे कनेक्शन हवाला रॅकेटशी असल्याचे स्पष्ट होत आहे.
महेश शशिकांत शहा (50, रा. नाना पेठ) आणि देवेंद्र स्वरूप कुमार शिंगवी (43, रा. मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गणेश भिवराज भुतडा (50, रा. रास्ता पेठ) आणि अशोक भवरलाल जैन (46, रा. हाईड पार्क, मार्केट यार्ड) यांना यापूर्वी अटक केली होती.
गणेश भुतडा याच्याकडे 3 मोबाइल, लॅपटॉप तसेच दोन बॅगमध्ये 92 लाख रुपये, नोटा मोजण्याचे मशीन सापडले होते. तपासादरम्यान, गणेश भुतडा याच्याकडील जप्त केलेल्या लॅपटॉपमधून त्याच्या अनेक ग्राहकांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यातूनच महेश शहा आणि देवेंद्र शिंगवे हेही बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक केली. भुतडा हा त्याने घेतलेले बेटिंग पुढे अमित पटेल नावाच्या आणखी एकाकडे पाठवित होता. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मुख्य आरोपी भुतडा हा ग्राहकांशी स्वत: संपर्क साधत नव्हता. त्याने ग्राहकांसाठी संपर्क साधण्यासाठी काही बुकी ठेवले होते. तांत्रिक विश्लेषणातून ही बाब पुढे आली आहे. बुकींशी संपर्क साधणाऱ्या ग्राहकांचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. यामध्ये बड्या व्यक्ती गुंतल्याचे सांगण्यात येत आहे.
बेटिंगसंदर्भात टीप मिळाल्यावर मागील काही महिन्यांपासून आम्ही बुकींच्या मागावर आहोत. आयपीएल सुरू होताच आम्ही सहा पथके तयार करून शहरात विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मोठ्या प्रमाणात सीम कार्ड आणि बेटिंगचे साहित्य सापडले.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त